पुणे. खडकवासला विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारसंघात नियुक्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले.
मनुष्यबळ प्रशिक्षण कक्षामार्फत सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांना केंद्राच्या 200 मीटर भोवतालची तसेच परिसरातील सुरक्षा व्यवस्था, मतदान केंद्राजवळ उभारल्या जाणा-या विविध राजकीय पक्षांच्या बूथबद्दलची नियमावली, मतदानासाठी आलेल्या मतदारांची शिस्त याबद्दल डॉ. माने यांनी माहिती दिली. मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सूक्ष्म नियोजन आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. मतदान प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकार अथवा नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील डॉ. माने यांनी यावेळी दिले.
निवडणुकीदरम्यान पोलीस यंत्रणेचे कर्तव्ये तसेच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रशिक्षण कक्ष प्रमुख माधुरी माने आणि तुषार राणे यांनी पोलीस पथकातील अधिकारी कर्मचा-यांना माहिती दिली. निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यात पोलीस यंत्रणेची भूमिका, जबाबदाऱ्या, आव्हाने आणि त्या संदर्भातले निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले नियम याबद्दल विस्तृत मार्गदर्शन या प्रशिक्षणामध्ये करण्यात आले.