स्वीप उपक्रमांतर्गत कॉसमॉस बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ
पुणे.लोकशाही परंपरांचे जतन करून मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखत मतदान करण्याची शपथ स्वीप समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना तांबे यांनी कॉसमॉस बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली.
यावेळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक के. हिमावती, पुणे शहरचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था संजय राऊत, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोकरे, उपाध्यक्ष यशवंत कासार, संचालक सचिन आपटे उपस्थित होते.
जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून श्रीमती तांबे म्हणाल्या, मतदारांनी निर्भयपणे धर्म, वंश, जात, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे. कॉसमॉस बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदानाचा संदेश आपल्या घरासह इतर परिचितांपर्यंत पोहोचवून सर्वांनी मतदान करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले.
मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नसल्याचे सांगून श्रीमती तांबे म्हणाल्या, मतदान केंद्रावर किमान आश्वासित सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय, उन्हा पासून बचावा करिता मंडप व्यवस्था, दिव्यांग व वृद्ध मतदारांना व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशीची धावपळ व गडबड टाळण्यासाठी आजच ‘व्होटर हेल्पलाईन’ ॲप डाउनलोड करून आपले मतदार यादीतील नाव तसेच मतदान केंद्राची माहिती मतदारांनी घ्यावी.
राऊत यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ५६ गृहनिर्माण संस्थांमध्ये ११५ मतदान केंद्र निर्माण करण्यात आले असल्याचे सांगितले. जिल्ह्यात एक २१ हजार ८५५ सहकारी गृहनिर्माण संस्था असून त्यामधील ५०० ते १ हजार घरांच्या संस्था असलेल्या ठिकाणी हे मतदान केंद्र प्रायोगिक तत्त्वावर निर्माण करण्यात आले आहेत. सहकारी संस्था तसेच बँकांचा नेहमीच शासनाच्या उपक्रमास सकारात्मक पाठिंबा असतो, असे सांगून सर्वांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान करावे असे आवाहन श्री. राऊत यांनी केले.
कार्यक्रमास कॉसमॉस बँकेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.