पुणे. महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आल्यानंतर राज्यातील सर्व जातीजमातीची जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. वेळ पडली तर,कायदेतज्ज्ञ व अन्यजनाबरोबर चर्चा करून 50% आरक्षण काढून हा प्रश्न सोडविता येईल का याचाही विचार केला जाणार असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते व आमदार अतुल लोंढे यांनी शनिवारी सायंकाळी मराठा समाजाच्या मेळाव्यात आपल्या भाषणात बोलताना सांगितले.
मराठा समाज विकास संघटनेतर्फे शनिवारी सायंकाळी शिवाजी मराठा शाळेत सकल मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात श्री लोंढे बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत,पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अंकुश काकडे, काँग्रेसचे नेते मोहन जोशी, संजय बालगुडे,काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट , रविंद्र माळवदकर संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, भगवानराव साळुंखे, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खामकर, मिलिंद पवार, उदय महाले,गजानन थरकुडे, आदी मान्यवर उपस्थित होते. श्री बाळासाहेब अमराळे, तुषार काकडे, विराज तावरे, प्रशांत धुमाळ, युवराज दिसलें, प्राची दुधाने, अनिकेत देशमाने आदींनी मराठा समाज विकास संघटनेतर्फे सकल मराठा समाजाच्या मेळाव्यासाठी पुढाकार घेऊन हा मेळावा आयोजित केला होता.
लोंढे आपल्या भाषणात म्हणाले की, सर्व जातीसमूहाची जातगणना केल्याशिवाय समाजाची आकडेवारीसहित खरी वस्तुस्थिती येणार नाही. त्यानंतरच आरक्षणाचा नव्याने निर्णय घेता येऊ शकतो. 50% काढल्याशिवाय आरक्षणाचा विषय हाताळता येऊ शकत नाही. असे आपल्याला वाटते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसने त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची समिती नेमली. या समितीने अभ्यास करून आरक्षण देण्याचा अहवाल त्यावेळी महाविकास आघाडीला सादर केला. त्यांनी तो मंजूरही केला. उच्च न्यायालयात हे आरक्षण ग्राह्य धरण्यात आले. नंतर भाजपशी संबंधित असलेल्या काही संस्थानी याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पुढे काय घडले हे सर्वश्रुत आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्या भाषणात म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीची भूमिका आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर 1 ल्या 100 दिवसात आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.महाविकास आघाडीने दिलेल्या आरक्षणाविरुद्ध भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी याचिका सादर केली होती.
या मेळाव्याचे समन्वयक श्री बाळासाहेब अमराळे आपल्या भाषणात मागणी केली की, अंतरवाली जराठी येथे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. एम पी एस सी व यू पी एस सीच्या विध्यार्थ्यांची समस्या दूर करावी. जातनिहाय जनगणना करावी.
तुषार काकडे यांनी प्रास्ताविक केले. विराज तावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सूत्रसंचालन केले.