सुषमा अंधारे यांचा पायी व रिक्षाने प्रवास!
जाहीर सभा व आचारसंहितेची वेळ पाळण्यासाठी
पुणे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या कसबा, पर्वती, कँटोन्मेंट व शिवाजीनगर या चार मतदारसंघांत दुपारनंतर जाहीर सभा झाल्या. प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी त्यांच्यासोबत होते. कसबा व पर्वती मतदारसंघांतील जाहीर सभा आटोपून त्या कँटोन्मेंट मतदारसंघातील जाहीर सभेसाठी मंगळवार पेठेतील कडबाकुट्टी चौक येथे निघाल्या. मात्र रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि एका राजकीय पक्षाची रॅली यामुळे त्यांना गर्दीतून पुढे जाता येईना. तेव्हा मोहन जोशी यांनी पटकटन निर्णय घेऊन शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह चक्क पायी चालत पुढे रिक्षा केली आणि तडक कडबाकुट्टी चौक गाठला. त्यांच्या जाहीर सभेसाठी अलोट गर्दी लोटली होती. तेव्हा सायंकाळचे ५ वाजले होते. तेथे महायुतीवर घणाघाती टीका करणारे भाषण करून १५ मिनिटांत त्या निघाल्या आणि गाडीतून बोपोडी गाठली. शिवाजीनगर मतदारसंघाचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्या जाहीर सभेसाठी तेथेही अलोट गर्दी लोटली होती. ठीक ५.४५ वाजता सुषमा अंधारे यांनी आपले भाषण सुरू करून महायुती सरकारवर शाब्दिक आसूड ओढत बरोब्बर ६ वाजता आपले भाषण संपवले. आचारसंहितेचा मात्र भंग होऊ दिला नाही.
सुषमाच्या भाषणामुळे या चारही मतदारसंघांतील वातावरण पूर्णपणे बदलले असून, तेथे महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित विजयी होतील, असे सांगून जाहीर सभा गाठायचीच व आचारसंहितेची वेळही पाळायची, या त्यांच्या जिद्दीचे मोहन जोशी यांनी कौतुक केले.