मराठी समाचार

२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत गोवा येथे होणार्‍या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने… हिंदु राष्ट्राला जनचळवळीचे रूप देणारे हिंदु राष्ट्र अधिवेशन !

Spread the love

प्रस्तावना : शेकडो वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिरात श्री रामलला विराजमान झाले. प्रभु श्रीराम अयोध्यापती झाल्यानंतर पृथ्वीवर रामराज्य अवतरले होते. श्रीराममंदिराच्या निर्माणानंतर हिंदुमनाला आता वेध लागले आहेत ते रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राचे ! काही वर्षांपूर्वीपर्यंत हिंदु राष्ट्र या शब्दाचा उच्चारही गुन्हा असल्यासारखी परिस्थिती होती; पण आज हिंदु राष्ट्राची चर्चा केवळ देशस्तरावर नाही, तर विश्वस्तरावर होत आहे. हा काळाचा महिमा आहे. एखादी घटना स्थूलातून घडण्यापूर्वी सूक्ष्मातून घडलेली असते, असे शास्त्र सांगते. रामायण घडण्यापूर्वी ते वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते. श्रीराममंदिराचे निर्माण हा सूक्ष्मातून रामराज्याचा अर्थात हिंदु राष्ट्राचा प्रारंभच आहे. ज्या श्रीरामासाठी विश्वभरातील हिंदु भाविक जात-पात-पक्ष-संप्रदाय आदी सर्व भेद विसरून उत्साहाने एक झाले. असेच संघटन, तसेच समर्पण हिंदु राष्ट्रासाठीही व्हावे. रामराज्यरूपी हिंदु राष्ट्रासाठी जी जनचळवळ उभी रहात आहे, ती शीघ्रातीशीघ्र सुफळ संपूर्ण व्हावी, अशी प्रार्थना !
* हिंदु राष्ट्राची संकल्पना : हिंदु राष्ट्राची संकल्पना राजकीय नाही, तर धर्माधिष्ठित आहे. केवळ ‘सेक्युलर’ शब्दाच्या ऐवजी ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द राज्यघटनेत समाविष्ट करणे, एवढ्यापर्यंतच हिंदु राष्ट्र सीमित नाही, तर हिंदु राष्ट्र ही एक आदर्श राज्यव्यवस्था आहे. आदर्श राज्यव्यवस्थेचा मापदंड रामराज्याने घालून दिला आहे. आज लाखो वर्षे उलटली, तरी ‘रामराज्य’ लोकांच्या लक्षात आहे; कारण त्याला धार्मिक अधिष्ठान होते. त्यामुळे रामराज्यातील नागरिक सुसंस्कृत, सुखी आणि समाधानी होते. तेथे भ्रष्टाचार, रोगराई, नैसर्गिक आपत्ती आदींना स्थान नव्हते. ‘श्रीरामाच्या शासनकाळात कधीही विलाप ऐकू आला नाही’, असे ‘रामराज्या’चे वर्णन महर्षि वाल्मीकि यांनी रामायणातील ‘युद्धकांडा’त लिहून ठेवले आहे. अशा रामराज्याच्या धर्तीवर असणार्‍या धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा उद्घोष गेली ११ वर्षे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात केला जात आहे. हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ हिंदूंचे राष्ट्र असे नाही, तर विश्वकल्याणार्थ कार्यरत सात्त्विक लोकांचे राष्ट्र !
* हिंदु राष्ट्राची आवश्यकता : आजची सेक्युलर व्यवस्था हिंदूंचे दमन आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारी आहे. सेक्युलर व्यवस्थेत मंदिरांचे सरकारीकरण केले जाते; मंदिरांचा देवनिधी अन्य पंथियांसाठी वापरला जातो; मात्र अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांचे सरकारीकरण होत नाही. सेक्युलर व्यवस्थेत देव-देश-धर्म रक्षणासाठी जागृती करणे हे ‘हेट स्पीच’ म्हणून गणण्याच्या घटना घडतात; पण सनातन धर्माची डेग्यू, मलेरिया, कुष्ठरोगाशी तुलना करून सनातन धर्माचे उच्चाटन करण्याच्या वल्गना करणार्‍यांवर कारवाई होत नाही. सेक्युलर व्यवस्थेत अन्य पंथियांना सरकारी अनुदानातून त्यांच्या धर्मानुसार शैक्षणिक संस्था स्थापन करता येतात; पण या देशात १०० कोटी असणार्‍या हिंदूंना मात्र ती मुभा नाही. नागरित्व सुधारणा कायद्याला (CAAला) विरोध करणारे कोट्यवधी बांग्लादेशी आणि लाखो रोहिंग्यांच्या घुसखोरीवर मौन राहतात. आजही हिंदूंच्या वेचून वेचून हत्या होत आहेत. उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये धर्मांधांनी २ कोवळ्या हिंदु मुलांच्या माना चिरण्याची भीषण घटना समोर आली होती. देशभर त्याचा तीव्र निषेध होत असतांना पोलीस चकमकीत दोषी धर्मांध मारला गेल्यावर त्याच्या अंत्ययात्रेला ३० हजारांचा समुदाय एकत्र आला. ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’, ‘लँड जिहाद’ आदी माध्यमांतून भारताचे आणि हिंदु समाजाचे लचके तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. नुकतेच ‘इत्तेहाद मिल्लत कौन्सिल’चे प्रमुख मौलाना तौकीर याने ‘मुसलमान युवक नियंत्रणाबाहेर गेले, तर देशात नागरी युद्ध भडकू शकते’, अशी उघड धमकी दिली होती. दक्षिण एशियातील मोठी शिक्षण संस्था असणार्‍या ‘दारुल उलुम देवबंद’ने भारताला ‘गझवा-ए-हिंद’ करण्याचा अर्थात् भारताचे इस्लामीकरण फतवा दिला आहे. या सगळ्या घटना सेक्युलर व्यवस्थेचे अपयश दाखवणार्‍या आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता दर्शवणार्‍या आहेत. हिंदु धर्म, तसेच राष्ट्र यांवर होणार्‍या आघातांवर ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हेच एकमेव उत्तर आहे. जसे ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन झाल्यानंतर इस्लामी पातशह्यांचा धुमाकूळ संपुष्टात आला, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना होताच सध्याची अराजकता थांबेल, हे निश्चित.
* अधिवेशनांची फलनिष्पत्ती : हिंदु राष्ट्राचा उद्घोष जनमानसांत पोचवण्यामध्ये अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांचा वाटा आहे, तसेच व्यवस्थेमध्ये हिंदुहिताचे बदल होण्यामध्येही अधिवेशनाचा सहभाग राहिला आहे. आज ‘सीएए’ (नागरिकत्व सुधारणा कायदा) लागू झाला आहे. हिंदु शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याच्या संदर्भात पहिल्या अधिवेशनापासूनच एकमुखाने ठराव संमत केले जायचे. या कायद्याचे प्रारूप ठरवण्यासाठी केंद्र सरकारकडून जी बैठक झाली, त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित केले होते.
त्या जोडीला लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांच्या विरोधात अधिवेशनामध्ये विचारमंथन, कृती आराखडा निश्चित केल्यानंतर आज उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हरियाणाक, कर्नाटक आदी राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदे करण्यात आले, तर उत्तरप्रदेशमध्ये हलाल उत्पादनांवर बंदी घालण्यात आली. केंद्र सरकारने ‘अपेडा’च्या (कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण) नियमावलीत सुधारणा करत मांस उत्पादक आणि निर्यातक यांना बंधनकारक असलेला ‘हलाल’ शब्द काढून टाकला आहे. या जोडीलाच अधिवेशनामध्ये गठित झालेल्या हिंदु विधीज्ञ परिषदेने सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. आज हिंदुहिताचे रक्षण होण्यासाठी, हिंदु विरोधी घटनांना चाप बसवण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषद कृतीशील झाली आहे. अधिवेशनामध्ये मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी विचारमंथन होऊन जो कृतीआराखडा ठरवला गेला, त्यानंतर जवळपास १ हजारहून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. कर्नाटकात मंदिरांवर कर आकारण्याचा निर्णय राज्य सरकारला रहित करावा लागला.
या अधिवेशनाला देश-विदेशांतील हिंदुत्वनिष्ठ, तसेच राष्ट्रनिष्ठ संटघनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहून हिंदु राष्ट्राच्या कार्याला गती देतात. परिणामस्वरूप आतापर्यंतच्या अधिवेशनांच्या माध्यमातून १००० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन झाले आहे, हिंदु राष्ट्राविषयी जागृती करणारी १८०० हून अधिक आंदोलने झाली आहेत, २००० हून अधिक व्याख्याने, तर प्रांतीय स्तरावर २०० हून अधिक हिंदु राष्ट्र अधिवेशन झाली आहेत. हिंदु राष्ट्राची चळवळ जनमानसामध्ये पोचवण्यामध्ये हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा वाटा आहे. आज जागतिक स्तरावर हिंदु परिषदा भरत आहेत, आध्यात्मिक महोत्सव साजरे केले जात आहेत. अधिवेशनाने वैचारिक, संवैधानिक, तसेच कृतीच्या स्तरावर केलेल्या हिंदु राष्ट्राच्या बीजारोपणाचा यात वाटा आहे. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे; परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’, या उक्तीनुसार संतांचे आशीर्वाद आणि ईश्वराची कृपा यांमुळे हे अधिवेशन यशस्वी होत आहे.
* यंदाचे अधिवेशन : यंदाही २४ ते ३० जून या कालावधीत फोंडा, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ अर्थात् द्वादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ संपन्न होणार आहे. सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा, हिंदु समाजाच्या रक्षणाचे उपाय, हिंदु राष्ट्रासाठी संवैधानिक प्रयत्न, मंदिर संस्कृतीच्या रक्षणाचे उपाय, वैश्विक स्तरावर हिंदुत्वाचे रक्षण हे यंदाच्या अधिवेशनाचे मुख्य पैलू असतील. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, तामिळनाडू येथील हिंदु मक्कल कच्छी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपत, भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह, तसेच काशी-मथुरा मंदिरांच्या मुक्तीसाठी कायदेशीर लढा देणारे सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन आदी प्रमुख वक्ते अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. हे अधिवेशन हिंदु जनजागृती समितीच्या www.hindujagruti.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येईल. सुखी-समाधानी-सुरक्षित जीवनाची हिंदु राष्ट्र हीच ‘गॅरंटी’ असल्याने हिंदु राष्ट्राच्या चळवळीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे!
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : ९९८७९ ६६६६६)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button