महाराष्ट्र

समाज कल्याण विभागामार्फत ‘नशामुक्त भारत अभियाना’चे आयोजन

Spread the love

 

पुणे. मादक पदार्थाच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याकरीता व भारताला अंमली पदार्थमुक्त बनविण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त भारत अभियाना’अंतर्गत सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे संतोष पटवर्धन, ऋषिकेश इंगळे, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक लेखा अधिकारी इंदल चव्हाण, गृहप्रमुख पी. बी. सुतार, जयश्री मोहळे आदी उपस्थित होते.

यावेळी लोंढे यांनी शासकीय वसतिगृहातील उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थीनींना व्यसनांपासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले. वाढत्या मोबाईल स्क्रिनच्या व्यसनापासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे, तसेच आपले भविष्य घडविण्याचा, आपल्या कुटुंबाचा विकास करण्यासाठी व शासनामध्ये उच्च पदे मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

 

पटवर्धन यांनी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होणाऱ्या अनेक प्रकारच्या व्यसनांनी ग्रस्त असलेल्या पिडितांना भोगाव्या लागणाऱ्या वेदना व व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे होणारे दुष्परिणामाची माहिती दिली. तसेच व्यसनांमुळे कुटुंबांवर होणाऱ्या परिणामासह शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक परिणामांबाबत माहिती देऊन व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले.

इंगळे यांनी, महाविद्यालयातील जीवन व आपले मित्र-मैत्रिण यांच्या सहवासातून जडणाऱ्या व्यसनाधीनतेवर आळा बसण्याकरीता स्वतःमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे असे सांगितले.

नशामुक्त भारत अभियान ५ व्या वर्षात पदार्पण करीत असून या वर्षाची संकल्पना ‘विकसित भारत का मंत्र, भारत हो नशेसे स्वतंत्र’ अशी आहे.

यावेळी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमास पुणे शहरातील समाज कल्याण विभागाच्या सर्व वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थीनी, गृहपाल यांच्यासह समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button